आपला जिल्हाताज्या घडामोडी
मृत खातेदारांच्या जमिनीवर ‘रेती’चा खेळ? ३७ हजार ब्रास मंजुरीने प्रशासन हादरले
रेती घोटाळाचा मोठा स्फ़ोट

गडचिरोली, प्रतिनिधी :-
आरमोरी तालुक्यातील करपाडा चक येथील रेती निष्कासन प्रकरणाने मोठा वाद पेटला असून, मृत खातेदारांच्या नावावरील जमिनीवरून तब्बल ३७ हजार ब्रास रेती मंजूर केल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. या संपूर्ण प्रकरणात लाचखोरी, नियमांची पायमल्ली आणि प्रशासन-वाळूमाफिया संगनमताचा गंभीर संशय व्यक्त होत असून सामाजिक कार्यकर्ते सुरज अशोक हजारे यांनी देसाईगंज उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.
करपाडा चक येथील सर्व्हे क्र. १५७/१ मधील ३.८८ हेक्टर जमीन मृत खातेदारांच्या नावावर असताना नियमबाह्य पद्धतीने पोटहिस्सा करून बेकायदेशीररीत्या ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या जमिनीवर यापूर्वी भुईमूग पीक घेतले जात असल्याचे सर्वश्रुत असतानाही प्रत्यक्षात रेती अस्तित्वात नसताना भूजल सर्वे विभागाकडून तब्बल ३७ हजार ब्रास रेती असल्याचा कथित बनावट अहवाल देण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
भू-अभिलेख विभागाने पावसाळी कालावधीत केलेल्या संशयास्पद सर्वेक्षणात वाळू असल्याचे नमूद केले असले तरी फेर सर्वेक्षणात कोणतीही स्पष्ट नोंद न करता प्रकरण पुढे ढकलण्यात आल्याने संपूर्ण प्रक्रियेवर संशयाची छाया निर्माण झाली आहे.
या प्रकरणात वाळूमाफियांच्या दबावाखाली निर्णय घेतल्याचा आरोप करत गौण खनिज प्रकरणात यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेले उपविभागीय अधिकारी प्रसनजीत प्रधान, आरमोरी तहसीलदार तसेच इतर संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर आंदोलनकर्त्यांनी थेट बोट ठेवले आहे. कोणतीही सखोल चौकशी न करता, तक्रारदाराला पूर्णतः अंधारात ठेवून रेती प्रस्ताव मंजूर करून तो जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
प्रशासकीय नियमांचे खुलेआम उल्लंघन, सरकारी यंत्रणेचा गैरवापर आणि मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचा संशय निर्माण झाल्याने या प्रकरणाची उच्चस्तरीय, निष्पक्ष आणि न्यायालयीन चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांची तात्काळ उचलबांगडी करावी, अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करून मोठ्या जनआंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे आरमोरी तालुक्यात प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट पसरली आहे.



