गडचिरोली, प्रतिनिधी :-
विश्व संवाद केंद्र, विदर्भ प्रांताच्या चंद्रपूर विभागाच्या वतीने आयोजित देवर्षी नारद जयंती समारोहात गडचिरोलीतील ज्येष्ठ पत्रकार अविनाश भांडेकर यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. चंद्रपूर येथील श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र प्रचारक प्रमोद बापट तसेच चंद्रपूरचे ज्येष्ठ पत्रकार मुरलीमनोहर व्यास यांची प्रमुख उपस्थिती होती.
गेल्या ३५ वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात विधायक व समाजाभिमुख पत्रकारिता करणाऱ्या अविनाश भांडेकर यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले आहे. त्यांच्या दीर्घकालीन पत्रकारितेतील योगदानाची दखल घेत या समारोहात त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
उत्तम शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त केलेल्या अविनाश भांडेकर यांनी आपल्या पत्रकारिता कारकिर्दीची सुरुवात साप्ताहिक सैनिकचे कार्यकारी संपादक म्हणून केली. त्यानंतर साप्ताहिक शिवछत्र, दैनिक जनवाद, दैनिक निर्मल महाराष्ट्र आणि दैनिक महाविदर्भ या वृत्तपत्रांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेतील आपला ठसा उमटविला. सन २००७ पासून ते दैनिक पुण्यनगरीचे गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत.
पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना महाराष्ट्र मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, मुंबई यांचा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, अरविंद बाबू देशमुख सामाजिक पत्रकारिता पुरस्कार तसेच महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे प्रदान करण्यात येणारा आचार्य बाळशास्त्री जांभेकर ‘दर्पण’ पुरस्कार यांसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
या सन्मानाबद्दल पत्रकार, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि गडचिरोली जिल्ह्यातील विविध स्तरांतून अविनाश भांडेकर यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पत्रकारितेच्या कार्याबद्दल गौरव व्यक्त करण्यात येत आहे.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button