जागतिक सायकल दिनानिमित्त गडचिरोली पोलीस दलाची सायकल रॅली

गडचिरोली, प्रतिनिधी :-
जागतिक सायकल दिनानिमित्त गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आरोग्य संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत वरिष्ठ अधिकारी, पोलीस कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसह १५० हून अधिक सहभागी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.
संयुक्त राष्ट्रसंघाने २०१८ पासून ३ जून हा दिवस ‘जागतिक सायकल दिन’ म्हणून घोषित केला आहे. सायकल हे स्वस्त, विश्वासार्ह, पर्यावरणपूरक आणि शाश्वत वाहतुकीचे साधन असून नियमित सायकल चालविल्याने शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहते. नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि दैनंदिन जीवनात सायकलीचा वापर वाढावा या उद्देशाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले.
सकाळी ७ वाजता पोलीस कवायत मैदान, गडचिरोली येथून सुरू झालेली रॅली इंदिरा गांधी चौकापर्यंत काढण्यात आली. रॅलीचा समारोप शहीद पांडू आलाम सभागृह येथे झाला. यावेळी सहभागींचा प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी नियमित सायकल चालविण्याचे महत्त्व अधोरेखित केले. सायकलचा वापर केल्याने आरोग्य सुधारते, पर्यावरण संवर्धनास हातभार लागतो आणि निरोगी जीवनशैली अंगीकारण्यास प्रोत्साहन मिळते, असे त्यांनी सांगितले. शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रत्येकाने आठवड्यातून किमान एक दिवस सायकलचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक अहेरी हर्षवर्धन बी. जे., पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे तसेच विशेष अभियान पथक व विविध शाखांतील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नागरी कृती शाखेचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत शेळके तसेच सर्व शाखांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.



