आपला जिल्हाताज्या घडामोडीसामाजीक
बंधाऱ्याच्या कामावर प्रश्नचिन्ह; नगरसेवक देशमुख यांची प्रशासनावर टीका

गडचिरोली, प्रतिनिधी :-
गडचिरोली शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर गोसीखुर्द धरणातून पाणी सोडण्याबाबत होत असलेल्या घोषणांवर नगरसेवक श्रीकांत देशमुख यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पाणीपुरवठा सभापतींकडून मोठमोठ्या जाहिराती करून नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप करत त्यांनी प्रत्यक्ष कामावर भर देण्याची मागणी केली आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात श्रीकांत देशमुख यांनी सांगितले की, गोसीखुर्द धरणातून पाणी सोडण्याची परवानगी मिळाल्याचा गाजावाजा केला जात असला तरी त्यांनी स्वतः संबंधित ठिकाणी जाऊन बंधाऱ्याच्या कामाची पाहणी केली असता वास्तव परिस्थिती वेगळीच आढळून आली.
त्यांच्या म्हणण्यानुसार, इतक्या महत्त्वाच्या आणि मोठ्या बंधाऱ्याच्या कामासाठी घटनास्थळी केवळ एक पोकलॅण्ड आणि दोन ब्रास क्षमतेचा एकच टिप्पर कार्यरत असल्याचे दिसून आले. एवढ्या अपुऱ्या यंत्रसामग्रीवर आणि मनुष्यबळावर बंधाऱ्याचे काम वेळेत आणि सक्षमपणे पूर्ण होईल का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
देशमुख यांनी पुढे म्हटले की, आजपर्यंत बंधाऱ्याचे काम अर्ध्याही टप्प्यापर्यंत पोहोचलेले नाही. सध्या उभारला जात असलेला बंधारा हा मातीचा तात्पुरता बंधारा असल्याचे दिसून येत आहे. भविष्यात गोसीखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्यास हा बंधारा टिकून राहील याची खात्री कोण देणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
जर हा बंधारा वाहून गेला तर शहरावर पुन्हा पाणीटंचाईचे गंभीर संकट ओढवू शकते आणि त्यासाठी खर्च झालेला जनतेचा पैसा वाया जाऊ शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. गडचिरोलीकरांना फोटोशूट, जाहिराती आणि सोशल मीडियावरील प्रसिद्धी नको असून पाणीप्रश्नावर ठोस नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी अपेक्षित असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रशासनाने तात्काळ अधिक यंत्रसामग्री, अतिरिक्त टिप्पर, सक्षम तांत्रिक नियोजन आणि टिकाऊ बांधकामाची व्यवस्था करून नागरिकांचा विश्वास संपादन करावा, अशी मागणी नगरसेवक श्रीकांत देशमुख यांनी केली आहे.
“गडचिरोलीकरांच्या पाण्याच्या प्रश्नावर कोणताही निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही,” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.



