नागपूर, प्रतिनिधी :-
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अनुसूचित जमातीच्या जातवैधता प्रकरणात महत्त्वपूर्ण निर्णय देत एकाच कुटुंबातील चार उमेदवारांना ‘हलबी’ अनुसूचित जमातीचे जातवैधता प्रमाणपत्र देण्याचे आदेश संबंधित जात पडताळणी समितीला दिले आहेत.
या निर्णयानुसार शिवम संजय नंदनवार, विजय प्रवीण नंदनवार, प्रवीण नंदनवार आणि आशुतोष प्रवीण नंदनवार यांना सहा आठवड्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र देण्याचे निर्देश येवतमाळ येथील अनुसूचित जमाती जात पडताळणी समितीला देण्यात आले आहेत.
या प्रकरणात अर्जदारांच्या कुटुंबातील काही सदस्यांकडे कोष्टी (विशेष मागास प्रवर्ग – SBC) जातीचे जात व वैधता प्रमाणपत्र असल्यामुळे समितीने अर्जदारांचा ‘हलबी’ अनुसूचित जमातीचा दावा फेटाळला होता. तसेच अर्जदारांची रूढी, परंपरा, चालीरीती आणि आप्तभाव चाचणी (Affinity Test) हलबी अनुसूचित जमातीशी सुसंगत नसल्याचे कारणही समितीने नमूद केले होते.
सुनावणीदरम्यान अर्जदारांच्या वतीने ॲड. अश्विन देशपांडे यांनी उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयातील संबंधित निर्णयांचा आधार घेत समितीच्या आदेशाला कायदेशीर आव्हान दिले. दोन्ही बाजूंचा विचार केल्यानंतर नागपूर खंडपीठाने समितीचा आदेश बाजूला सारत अर्जदारांच्या बाजूने निर्णय दिला.
या निर्णयानंतर नंदनवार कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले असून, त्यांच्या वतीने खटला प्रभावीपणे मांडणारे ॲड. अश्विन देशपांडे यांचेही अभिनंदन करण्यात येत आहे.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button