आपला जिल्हाताज्या घडामोडीराजकीय
भेंडाळा व हिरापूर जमीन अधिग्रहणाविरोधातील आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा

गडचिरोली, प्रतिनिधी :-
गडचिरोली तालुक्यातील हिरापूर मुसळा परिसरातील प्रस्तावित विमानतळ प्रकल्प तसेच चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील १४ गावांच्या जमिनी एमआयडीसीसाठी अधिग्रहित करण्याच्या प्रक्रियेविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीने जाहीर पाठिंबा दिला आहे.
जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. विश्वजीत कोवासे यांनी शेतकरी संघर्ष कृती समितीला दिलेल्या पत्राद्वारे हा पाठिंबा जाहीर केला आहे. या पत्रात स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करून त्यांना भूमिहीन करण्याचा प्रयत्न अन्यायकारक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
पत्रानुसार, हिरापूर मुसळा परिसरातील विमानतळ प्रकल्प आणि भेंडाळा परिसरातील एमआयडीसीसाठी मोठ्या प्रमाणात जमीन अधिग्रहण करण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या ठिय्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे.
शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी आणि जमीन अधिग्रहण रद्द करण्याच्या मागणीसाठी ४ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित आंदोलनात जिल्हा काँग्रेस कमिटी सक्रिय सहभाग घेणार असल्याचेही ॲड. कोवासे यांनी स्पष्ट केले आहे.



