आपला जिल्हा

पत्रकार सुरज गुंडमवार राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्काराने गौरविले जाणार

गडचिरोलीचा निर्भीड आवाज ठरला सन्मानाचा मानकरी!

गडचिरोली, प्रतिनिधी :–
सामाजिक बांधिलकी जपत लोकहिताचे प्रश्न निर्भीडपणे मांडणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील पत्रकार सुरज गुंडमवार यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय ‘शिवछत्रपती पुरस्कार २०२६’ जाहीर झाला असून, जिल्ह्यासाठी ही अभिमानाची आणि गौरवाची बाब ठरली आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि बहुउद्देशीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आश्रयआशा फाऊंडेशन, मालेगाव संस्थेतर्फे हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.
पत्रकार सुरज गुंडमवार यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडत वंचित आणि दुर्लक्षित घटकांच्या समस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्यपूर्ण लढा उभारला आहे. प्रशासन आणि नागरिक यांच्यात समन्वयाचा मजबूत सेतू निर्माण करत सामाजिक जबाबदारी जपत लोकहिताचे मुद्दे प्रभावीपणे मांडल्याबद्दल त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
राज्यस्तरीय या पुरस्कार वितरणाचा भव्य-दिव्य सोहळा मालेगाव येथे लवकरच पार पडणार असून, कार्यक्रमास आमदार, खासदार, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याशिवाय सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बांधव, विविध संघटनांचे पदाधिकारी, महिला प्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक आणि समाजातील विविध स्तरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
आश्रयआशा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र राऊत पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र तू. पवार आणि सचिव आशाताई बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली संस्था राज्यभरात सामाजिक, शैक्षणिक आणि बहुउद्देशीय उपक्रम राबवत आहे. समाजातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचे कार्य समाजासमोर आणून त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्याची परंपरा संस्था सातत्याने जपत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.
राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार हा सुरज गुंडमवार यांच्या प्रामाणिक, निर्भीड आणि लोकाभिमुख पत्रकारितेचा अधिकृत गौरव मानला जात असून, त्यांच्या या यशामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या पत्रकारिता क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यभरातील सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्राचे लक्ष या सोहळ्याकडे लागले असून, कार्यक्रमाच्या तयारीला वेग आला आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker