ताज्या घडामोडीदेश विदेश
सरकारी कार्यक्रमांबरोबरच शाळांमध्येही राष्ट्रगीतापूर्वी संपूर्ण ‘वंदे मातरम्’ अनिवार्य

नवी दिल्ली, प्रतिनिधी :-
केंद्र सरकारने राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीताच्या सादरीकरणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला असून, यापुढे अधिकृत सरकारी कार्यक्रमांबरोबरच शाळांमध्येही राष्ट्रगीत ‘जन गण मन’ गाण्यापूर्वी राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ चे संपूर्ण सहा कडव्यांसह सादरीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने २८ जानेवारी रोजी यासंदर्भातील नवीन नियमावली जारी केली आहे. या नियमावलीनुसार राष्ट्रपतींचे आगमन, ध्वजारोहण, राज्यपालांचे भाषण तसेच इतर अधिकृत शासकीय कार्यक्रमांमध्ये आणि शाळांमधील राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये ही अट लागू राहणार आहे. राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत दोन्ही सादर केले जाणार असल्यास ‘वंदे मातरम्’ प्रथम सादर केले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी लिहिलेल्या ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या संपूर्ण सादरीकरणासाठी ३ मिनिटे १० सेकंदांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. यापूर्वी या गीताच्या केवळ पहिल्या कडव्याचे सादरीकरण केले जात होते. मात्र, नव्या निर्णयानुसार सर्व सहा कडव्यांचे गायन आवश्यक असून, या वेळी उपस्थितांनी सावधान स्थितीत उभे राहणे बंधनकारक राहणार आहे.



