वाशीम, प्रतिनिधी :-
लोकशाहीत जनमत सर्वश्रेष्ठ असल्याचे प्रभावी उदाहरण वाशीम जिल्ह्यातील ब्रम्हा गावाने घालून दिले आहे. गावाच्या प्रवेशद्वारावरील मद्यविक्री दुकान बंद करण्यासाठी घेण्यात आलेल्या विशेष मतदानात महिलांनी अभूतपूर्व एकजूट दाखवत तब्बल ९७.३९ टक्के मतदान दारूबंदीच्या बाजूने केले. त्यामुळे संबंधित वाईन बारचा परवाना रद्द होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
वाशीम-पुसद मार्गावरील ऋषी रेस्टॉरंट व वाईन बारमुळे परिसरातील विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि सामाजिक वातावरण धोक्यात येत असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली होती. सरपंच मनीषा मुसळे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामसभेने मद्यविक्री परवाना रद्द करण्याचा ठराव मंजूर केला. त्यानंतर प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली अधिकृत मतदान प्रक्रिया पार पडली.
निवडणूक निर्णय अधिकारी साहेबराव नप्ते यांनी निकाल जाहीर करताच महिलांनी जल्लोष मिरवणूक काढत दारूबंदीच्या निर्णयाचे स्वागत केले. जिल्ह्यात अशा प्रकारे महिलांच्या पुढाकारातून घेतलेला हा पहिलाच निर्णय मानला जात असून, व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी ब्रम्हा गावातील महिलांनी उचललेले हे पाऊल राज्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
Back to top button