आरमोरी, प्रतिनिधी :-
आरमोरी शहर व परिसरात अंत्यविधीसाठी लागणारे जळाऊ लाकूड (जळाऊ बिट) उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः गरीब कुटुंबात मृत्यू झाल्यास लाकूड मिळविण्यासाठी तालुक्याबाहेर धाव घ्यावी लागत असल्याने आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, सध्या आरमोरी येथे जळाऊ लाकूड उपलब्ध नसल्यामुळे मेंडकी (ता. ब्रम्हपुरी) येथून लाकूड आणावे लागते. यासाठी अतिरिक्त वाहतूक खर्च करावा लागतो. परिणामी, आधीच दुःखात असलेल्या कुटुंबांवर आर्थिक भुर्दंड बसत आहे.
या पार्श्वभूमीवर वन विभागाच्या नियोजनशून्य कारभारावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अंत्यसंस्कारासारख्या अत्यावश्यक कामासाठी आवश्यक जळाऊ लाकूड स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, संबंधित प्रश्न तातडीने सोडवावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकपा) दिला आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन तात्काळ उपाययोजना करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button