आपला जिल्हाताज्या घडामोडी
राष्ट्रीय महामार्ग वरील गतीरोधक प्रकरणी चौकशीची मागणी

गडचिरोली,प्रतिनिधी :-
गडचिरोली–नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३ सीवरील प्लॅटिनम जुबली इंग्लिश स्कूलसमोर उभारण्यात आलेल्या गतीरोधकाबाबत चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात दिनेश बाबाराव बोरकुटे (रा. साखरा, ता. जि. गडचिरोली) यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना लेखी निवेदन दिले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, संबंधित शाळा महामार्गापासून सुमारे २० फूट अंतरावर असून विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना अडचणी येत आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक होते.
मात्र, महामार्ग मंत्रालयाच्या दिनांक २९/०८/२०१४ च्या परिपत्रकानुसार तसेच सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या रस्ता सुरक्षा समितीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राष्ट्रीय महामार्गाच्या मुख्य मार्गावर गतीरोधक (स्पीड ब्रेकर) उभारण्यास मनाई असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. असे असताना संबंधित ठिकाणी गतीरोधक उभारण्यात आल्याने तो नियमबाह्य असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच हा गतीरोधक कोणत्या नियमांनुसार व कोणाच्या आदेशाने उभारण्यात आला, याची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भातील पूर्वीचे निवेदन, पत्रव्यवहार आणि गतीरोधकाचे छायाचित्रे जोडण्यात आल्याचेही पत्रात नमूद आहे. दरम्यान, या प्रकरणी संबंधित विभागाकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे.
निवेदन वाचा…


