गडचिरोली, प्रतिनिधी :-
जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या गुरवळा नदी परिसरातील जंगल भागात एका १७ वर्षीय तरुणाची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि.२८) उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तीन संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासात पैशांच्या वादातून हे हत्याकांड घडल्याचे समोर आले आहे.
बादल नकटुजी कोसनकर (वय १७, रा. डोंगरगाव, ता. गडचिरोली) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. २७ मे रोजी दुपारी सुमारे १.३० ते २.०० वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. आरोपींनी बादल याला गडचिरोली–गुरवळा मार्गावरील जंगल परिसरात बोलावले होते. त्याठिकाणी पैशांच्या देणे-घेण्यावरून वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपींनी धारदार कुऱ्हाडीने बादलच्या डोक्यावर व मानेवर सपासप वार करून त्याची अत्यंत क्रूरपणे हत्या केली.
गुरुवारी सकाळी गुरवळा नदी परिसरात मृतदेह आढळून आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.
या प्रकरणी दाखल तक्रारीवरून पोलिसांनी तीन संशयित आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) व ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. संशयित आरोपींची ओळख पटविण्यासह पुढील तपास प्रवीण बुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
गुरवळा परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या या हत्याकांडामुळे स्थानिक गावकरी हादरले असून संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button