ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
गडचिरोली हादरली! जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यावर लैंगिक छळ आणि भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप.

गडचिरोली, प्रतिनिधी :-
गडचिरोली येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांच्या कार्यपद्धती आणि वर्तनाबाबत अत्यंत गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. कुरखेडा येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुजिता वाडीवे यांनी डॉ. शिंदे यांच्यावर भ्रष्टाचारासाठी दबाव टाकणे, मानसिक व लैंगिक छळ करणे, विनयभंग, आणि जातीवाचक अपमान केल्याचे खळबळजनक आरोप केले आहेत. याप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या महिला आघाडीने आक्रमक पवित्रा घेत डॉ. शिंदे यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
औषध खरेदीत भ्रष्टाचाराचा दबाव आणि छळ
डॉ. वाडीवे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, हिवताप नियंत्रणासाठी आवश्यक साहित्य आणि औषध खरेदी प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवण्याचा प्रयत्न केला असता, डॉ. शिंदे यांनी विशिष्ट पुरवठादारांना लाभ मिळवून देण्यासाठी दबाव आणला. शासकीय नियमांचे उल्लंघन करून अधिकारांचा गैरवापर करण्यात आला. वारंवार फोन करून मानसिक त्रास आणि धमक्या देण्यात आल्या, तसेच खोटी माहिती व बनावट कागदपत्रे सादर करण्यास भाग पाडल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
महिला आघाडीचा तीव्र निषेध आणि आंदोलनाचा इशारा
या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या महिला आघाडीने गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर यांना निवेदन सादर केले आहे. संघटनेने मागणी केली आहे की, या प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी व्हावी. चौकशी पूर्ण होईपर्यंत डॉ. शिंदे यांना पदावरून दूर करावे आणि दोष सिद्ध झाल्यास कडक शिस्तभंग व कायदेशीर कारवाई करावी. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत.




