ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
१२५ रुपयांसाठीचा लढा यशस्वी; ग्राहक आयोगाचा महानगरपालिकेला दणका
नंदिनी चुनारकर यांचे मार्गदर्शन

चंद्रपूर, प्रतिनिधी :-
केवळ १२५ रुपयांसाठी सुरू केलेला लढा यशस्वी करून चंद्रपूर येथील कैलास गर्गेलवार यांनी ग्राहक हक्कांची जाणीव करून दिली आहे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, चंद्रपूर यांनी या प्रकरणात महानगरपालिकेविरोधात महत्त्वपूर्ण आदेश दिल्याने शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.
पाणीपुरवठा देयकातील त्रुटींविरोधात गर्गेलवार यांनी आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात आयोगाचे अध्यक्ष नितीन कुमार स्वामी व सदस्या स्वाती देशपांडे यांनी तक्रार अंशतः मंजूर करत १२५ रुपये ही रक्कम तक्रार दाखल केल्याच्या तारखेपासून ९ टक्के वार्षिक व्याजासह परत देण्याचे आदेश दिले.
याशिवाय, झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासाबद्दल ५ हजार रुपये आणि तक्रारीचा खर्च म्हणून आणखी ५ हजार रुपये देण्याचेही आदेश आयोगाने दिले आहेत. आदेशाची अंमलबजावणी प्रत मिळाल्यापासून ४५ दिवसांच्या आत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२४ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीतील पाणीकराची आकारणी महानगरपालिकेकडून दोनदा करण्यात आली होती. त्यामुळे अतिरिक्त भरलेले १२५ रुपये परत करावेत किंवा पुढील बिलात समायोजित करावेत, अशी मागणी गर्गेलवार यांनी केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांनी ग्राहक आयोगाकडे धाव घेतली.
ग्राहक संरक्षण अधिनियम २०१९ च्या कलम ३५ अंतर्गत ही तक्रार ३ मार्च २०२५ रोजी दाखल करण्यात आली होती. जवळपास ११ महिने २२ दिवसांच्या सुनावणीनंतर २५ फेब्रुवारी २०२६ रोजी अंतिम निर्णय देण्यात आला.
या प्रकरणात अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य नंदिनी चुनारकर यांनी मार्गदर्शन केल्याचे गर्गेलवार यांनी सांगितले.



