नागपूर, प्रतिनिधी :-
अखिल भारतीय ग्राहक पंचायत (र. नं. एस-९१९४, दिल्ली) नागपूर जिल्हा व महानगर कार्यकारिणी संदर्भात सुरू असलेल्या संभ्रमावर पडदा टाकत पश्चिम क्षेत्रीय संघटन मंत्री नितीन काकडे यांनी अधिकृत कार्यकारिणीबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे.
काकडे यांनी सांगितले की, नागपूर जिल्ह्यात अध्यक्ष संजय साळवे व सचिव प्रभाकर शिवणकर यांच्या नेतृत्वाखाली, तसेच विदर्भ प्रांताध्यक्ष डॉ. नारायण मेहरे यांनी जाहीर केलेली कार्यकारिणीच अधिकृत आहे. नागपूर महानगरात अध्यक्ष शरद जिचकार व सचिव विनोद चरपे यांच्या नेतृत्वाखालील कार्यकारिणीलाच मान्यता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या दोन्ही कार्यकारिणींनाच केंद्र व विदर्भ प्रांत कार्यकारिणीची अधिकृत मान्यता असून, अन्य कोणतीही जिल्हा किंवा महानगर कार्यकारिणी अस्तित्वात नसल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, गणेश शिरोळे व प्रकाश भुजाडे यांच्यासह काही स्वयंघोषित पदाधिकारी स्वतःला पदाधिकारी म्हणून सादर करत असल्याचे समोर आले आहे. वृत्तपत्रांमध्ये बातम्या देऊन व बैठका घेऊन ते नागरिक व प्रशासनाची दिशाभूल करत असल्याचा आरोपही काकडे यांनी केला. संबंधितांना संघटनेचे चिन्ह व नोंदणी क्रमांक वापरण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विदर्भ प्रांत कार्यकारिणीचे अध्यक्ष डॉ. नारायण मेहरे, सचिव डॉ. चारुदत्त चौधरी व संघटक अभय खेडकर हे कार्यरत असून, जिल्हा व तालुका कार्यकारिणी नियुक्तीचे अंतिम अधिकार त्यांच्याकडेच असल्याचेही त्यांनी सांगितले.
संघटनेचे चिन्ह व नोंदणी क्रमांकाचा अनधिकृत वापर करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही काकडे यांनी दिला.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत ही देशातील प्रमुख ग्राहक संघटना असून, १९८६ च्या ग्राहक संरक्षण कायदा तसेच २०१९ च्या सुधारित कायद्याच्या निर्मितीत तिचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. संघटनेचे अखिल भारतीय अध्यक्ष अॅड. नारायणभाई शहा व सचिव जयंत काथीरिया आहेत.
दरम्यान, या घडामोडींवर संघटनेचे नागपूरचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गजानन पांडे यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
Back to top button