ताज्या घडामोडीसाहित्यिक
५० पुस्तकांचे एकत्र प्रकाशन; पुण्यात जागतिक विक्रमाची नोंद

पुणे, प्रतिनिधी :-
वेलवेट पब्लिकेशन आणि झेप सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ४४ लेखकांची तब्बल ५० पुस्तके एकाच वेळी प्रकाशित करून जागतिक विक्रमाची नोंद करण्यात आली आहे. या अनोख्या उपक्रमाची नोंद ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये करण्यात आली.
सांगवी येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात रविवारी हा सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी सुप्रसिद्ध लेखिका रोहिणी निनावे, गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नाव असलेल्या गायिका मंजुश्री ओक, पत्रकार समीक्षक सौमित्र पोटे तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचे अशोक आदक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. वेलवेट पब्लिकेशनच्या संस्थापक वर्षा विशाल ठुकरूल आणि सिंधू बागवे मंचावर उपस्थित होत्या.
या कार्यक्रमात वय वर्षे ९ ते ८० या विविध वयोगटातील लेखकांची पुस्तके प्रकाशित करण्यात आली. कथासंग्रह, काव्यसंग्रह, कादंबरी, विनोदी साहित्य, चारोळीसंग्रह तसेच बालकथा संग्रह अशा विविध साहित्यप्रकारांचा यात समावेश होता.
प्रास्ताविकात वर्षा ठुकरूल यांनी सांगितले की, वेलवेट पब्लिकेशन नवोदित लेखकांसाठी एक व्यासपीठ असून ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर पुस्तके प्रकाशित केली जातात. गेल्या दहा महिन्यांत ६५ पुस्तके प्रकाशित करण्यात आली असून आजच्या कार्यक्रमात बहुतेक लेखकांचे हे पहिलेच पुस्तक आहे.
विक्रमाची अधिकृत घोषणा करताना अशोक आदक यांनी सांगितले की, साहित्यनिर्मितीसाठी वय किंवा व्यवसायाचे बंधन नसते, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले आहे.
रोहिणी निनावे यांनी प्रत्येक व्यक्तीत एक लेखक दडलेला असतो, असे सांगत विशेषतः महिलांच्या आयुष्यातील अनुभव साहित्यरूपाने व्यक्त होणे गरजेचे असल्याचे नमूद केले. सौमित्र पोटे यांनी बोलीभाषेतूनही समृद्ध साहित्य निर्माण होऊ शकते, असे मत व्यक्त केले.



