आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भाजपा नगरसेवक दाम्पत्यासह तिघांवर ४२० चा गुन्हा

ट्रॅक्टर विक्रीचा बनाव करून साडेसात लाखांची फसवणूक;

गडचिरोली, प्रतिनिधी :-

उसने घेतलेल्या पैशांच्या परतफेडीवेळी ट्रॅक्टर विक्रीचा बनाव रचून सुमारे ७ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून चामोर्शी येथील भाजपचे नगरसेवक आशिष पिपरे, त्यांच्या पत्नी नगरसेविका सोनाली पिपरे आणि वडील अरुण पिपरे यांच्याविरुद्ध २७ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली असून, संबंधित प्रकरणात कारवाईच्या मागणीसाठी महिलांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाचव्या दिवशीही उपोषण सुरू आहे.

ट्रॅक्टर व्यवहारातून फसवणुकीचा आरोप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वंदना रवींद्र कोठारे (वय ३७, रा. चामोर्शी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, २०२१ च्या नगरपंचायत निवडणुकीच्या काळात आशिष पिपरे यांनी कोठारे कुटुंबाकडून ३ लाख रुपये उसने घेतले होते. परतफेडीचा तगादा लावल्यानंतर त्यांनी स्वतःचा ट्रॅक्टर ७ लाख ५० हजार रुपयांत विकण्याचा प्रस्ताव दिला. आधीचे ३ लाख वजा करून उर्वरित ४ लाख ५० हजार रुपये रोख व बँक व्यवहाराद्वारे देण्यात आले. मात्र, पूर्ण रक्कम स्वीकारूनही ट्रॅक्टरची मूळ कागदपत्रे देण्यात टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप आहे.

२० मार्च २०२३ रोजी अर्थसहाय्य कंपनीचे प्रतिनिधी कोठारे यांच्या घरी आले असता संबंधित ट्रॅक्टरवर ४ लाख ८० हजार रुपयांचे थकीत कर्ज असल्याचे उघड झाले. तसेच तो ट्रॅक्टर अरुण पिपरे यांच्या नावावर असल्याचे समोर आले. ट्रॅक्टर पत्नीच्या नावावर असल्याचे भासवून विश्वास संपादन केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. पैसे परत मागितल्यावर शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

अगरबत्ती प्रकल्पातही गैरव्यवहाराचा आरोप

आशिष पिपरे यांच्यावर चामोर्शी परिसरातील सुमारे ४० गरीब शेतकरी व शेतमजूर महिलांची फसवणूक केल्याचाही आरोप आहे. अगरबत्ती उद्योगासाठी स्वयंरोजगार योजनेअंतर्गत कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून प्रत्येकी सुमारे १ लाख ९० हजारांचे कर्ज मंजूर करून त्यातील मोठा हिस्सा स्वतःकडे वळविल्याचा आरोप महिलांनी केला आहे. महिलांना अत्यल्प रक्कम देऊन निकृष्ट यंत्रसामग्री पुरविण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

उपोषणाचा पाचवा दिवस

गेल्या दोन वर्षांपासून तक्रारी देऊनही राजकीय दबावामुळे गुन्हा नोंद होत नसल्याचा आरोप करत महिलांनी २३ फेब्रुवारीपासून उपोषण सुरू केले आहे. आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ४०६, ४२०, ५०४, ५०६ व ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. तपास हवालदार रामदास कोडापे करीत आहेत.

दरम्यान, आशिष पिपरे यांनी यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

उपोषणात सहभागी महिलांची प्रकृती खालावत असल्याचे सांगण्यात येत असून, तातडीने निष्पक्ष चौकशी करून न्याय द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker