नागपूर शहरातील Chanakyapuri परिसरातील नरसाळा भागात सार्वजनिक पाण्याच्या टाकीजवळ साठवून ठेवलेले गडरलाईन प्रकल्पातील शेकडो प्लास्टिक व सिंथेटिक पाईप रविवारी सकाळी लागलेल्या आगीत जळून खाक झाले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
चाणक्यपुरम व नरसाळा परिसरात सध्या गडरलाईन टाकण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या कामासाठी लागणारे हजारो पाईप पाण्याच्या मोठ्या टाकीजवळ मोकळ्या जागेत साठवून ठेवण्यात आले होते. दिनांक १ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास या पाईपच्या साठ्यातून धूर निघत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले.
चाणक्यपुरम येथील रहिवासी जितेंद्र मुळे यांनी तात्काळ अग्निशमन विभागाला दूरध्वनीद्वारे माहिती दिली. अवघ्या १५ ते २० मिनिटांत अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून सुमारे १५ मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले.
या आगीत शेकडो पाईप जळून खाक झाले असून, मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आग वेळीच आटोक्यात आली नसती तर उर्वरित पाईप साठाही आगीच्या भक्ष्यस्थानी पडला असता.
घटनास्थळाच्या आजूबाजूला निवासी घरे असल्याने संभाव्य मोठा अनर्थ टळला. मोकळ्या जागेत कचरा जाळल्यामुळे ठिणग्या उडून आग पाईपपर्यंत पोहोचली असावी, असा प्राथमिक अंदाज नागरिकांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, पोलिस व अग्निशमन विभागाकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.