नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील रावुळगाव परिसरात असलेल्या SBL Explosives Ltd या स्फोटक निर्मिती कारखान्यात रविवारी सकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत २० कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून १५ हून अधिक कामगार जखमी झाले आहेत. जखमींवर नागपूर येथील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
सकाळच्या शांत वातावरणात झालेल्या प्रचंड स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरला. कारखान्यातील काही भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून घटनास्थळी धुराचे लोट उसळताना दिसत होते. स्फोटाची तीव्रता इतकी होती की आजूबाजूच्या परिसरातही त्याचा आवाज घुमला.
सलग अपघातांमुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह :-
गेल्या काही वर्षांत नागपूर जिल्ह्यात औद्योगिक अपघातांच्या घटना घडत असून सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. अमरावती मार्गावरील सोलार उद्योगातील स्फोट तसेच Chandika Explosives येथील दुर्घटना यापूर्वीही चर्चेत आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर रावुळगाव येथील ताज्या घटनेने पुन्हा एकदा औद्योगिक सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
कुटुंबीयांचा आक्रोश :-
दुर्घटनेनंतर कारखान्याबाहेर कामगारांच्या कुटुंबीयांची मोठी गर्दी झाली होती. आपल्या नातेवाईकांची माहिती मिळवण्यासाठी व्याकुळ झालेल्या कुटुंबीयांचे अश्रू आणि आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. मृतांमध्ये कुटुंबाचा एकमेव आधार असलेले अनेक कामगार असल्याची माहिती पुढे येत आहे.
चौकशीचे आदेश :-
घटनेनंतर पोलिस व प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा व प्राथमिक तपास सुरू आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी तांत्रिक बिघाड किंवा सुरक्षा त्रुटीची शक्यता वर्तवली जात आहे. शासनाकडून चौकशीचे आदेश दिले जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, जनप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी भेट देणार असून मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची घोषणा केली जाऊ शकते. मात्र वारंवार घडणाऱ्या अशा दुर्घटनांमुळे औद्योगिक सुरक्षेच्या अंमलबजावणीवर अधिक कठोर पावले उचलण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.