गडचिरोली, प्रतिनिधी :-
होळी सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध दारूची विक्री व वाहतूक रोखण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीविरुद्ध कारवाई करत चारचाकी वाहनासह एकूण १२ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी लागू असताना सणासुदीच्या काळात छुप्या पद्धतीने दारू विक्री व पुरवठ्याचे प्रकार वाढण्याची शक्यता लक्षात घेता, पोलीस अधीक्षक निलोपतल यांनी अवैध दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
दि. १ मार्च २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की, अजय चिचघरे (रा. खरपुंडी, ता. जि. गडचिरोली) हा आपल्या साथीदारांसह यूपी १६ डीबी ०५९० क्रमांकाच्या चारचाकी वाहनातून पोमके पोटेगाव हद्दीत अवैध विदेशी दारूचा पुरवठा करणार आहे.
या माहितीच्या आधारे पथकाने मौजा नवरगाव येथे दोन पंचांसमक्ष सापळा रचला. संशयित वाहन येताच पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन रस्त्याच्या कडेला थांबवून दोन जणांसह अंधाराचा फायदा घेत पसार होण्याचा प्रयत्न केला.
वाहनाची तपासणी केली असता खालीलप्रमाणे दारूचा साठा आढळून आला.
रॉयल स्टॅग डिलक्स कंपनीच्या १८० एमएलच्या १०५६ सिलबंद बाटल्या (अंदाजे किंमत ३,१६,८०० रु.)
९० एमएलच्या १०० बाटल्या (अंदाजे किंमत १५,००० रु.)
१ लिटरच्या २३ बाटल्या (अंदाजे किंमत ४६,००० रु.)
हायवर्ड ५००० प्रिमियम बिअरच्या ५०० एमएलच्या १४४ टिन (अंदाजे किंमत ४३,२०० रु.)
दारू वाहतुकीसाठी वापरलेले टाटा कंपनीचे चारचाकी वाहन (अंदाजे किंमत ८,००,००० रु.)
अशा प्रकारे एकूण १२,२१,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर प्रकरणी पोस्टे गडचिरोली येथे महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कलम ६५(अ), ८३, ९८(२) अंतर्गत आरोपी अजय चिचघरे याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सीमा किंकर करीत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पत, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) कार्तिक मधीरा व अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोनि अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात पार पडली.
होळी सणाच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध अशाच प्रकारे कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
Back to top button