आपला जिल्हाकृषी व व्यापारताज्या घडामोडी

गडचिरोलीत वजनकाट्यांची विशेष तपासणी मोहीम राबविण्याची मागणी

ग्राहक पंचायतचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गडचिरोली, प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे बनावट ब्रँड स्टिकर लावून तसेच बनावट बिलबुकांच्या माध्यमातून वजनकाट्यांची विक्री करून ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी २०० हून अधिक वजनकाटे जप्त करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातही विशेष तपासणी मोहीम राबविण्याची मागणी ग्राहक पंचायत, गडचिरोलीने केली आहे.

यासंदर्भात ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष उदय धकाते यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, सहाय्यक नियंत्रक वैधमापन शास्त्र विभाग तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, ब्रह्मपुरी हे गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरील महत्त्वाचे व्यापारी केंद्र असून या भागातून गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला, अन्नधान्य, किराणा माल व इतर जीवनावश्यक वस्तूंची आवक-जावक होत असते. त्यामुळे ब्रह्मपुरी येथे उघडकीस आलेल्या गैरप्रकाराचा परिणाम गडचिरोली जिल्ह्यातील ग्राहकांवरही झालेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ग्राहक पंचायतने जिल्ह्यातील किराणा दुकाने, धान्य खरेदी केंद्रे, स्वस्त धान्य दुकाने, भाजी मंडई, सराफा दुकाने, हार्डवेअर दुकाने, व्यापारी संकुले, पेट्रोल पंप तसेच इतर व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वजनकाट्यांची तातडीने तपासणी करण्याची मागणी केली आहे. अप्रमाणित अथवा नियमबाह्य वजनकाट्यांमुळे ग्राहकांची आर्थिक फसवणूक होत असल्यास त्याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

ग्राहक पंचायतने प्रशासनाकडे सात प्रमुख मागण्या केल्या असून त्यामध्ये जिल्हाभर विशेष तपासणी मोहीम राबविणे, सर्व वजनकाटे व मोजमाप साधनांची वैधमापन शास्त्र विभागामार्फत तपासणी करणे, बनावट स्टिकर किंवा मुदतबाह्य प्रमाणपत्र असलेले वजनकाटे जप्त करणे, दोषींविरुद्ध वैधमापन शास्त्र अधिनियम २००९ अंतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करणे, ब्रह्मपुरी प्रकरणातील उपकरणांचा जिल्ह्यात वापर होत आहे का याची चौकशी करणे, ग्राहक जनजागृती मोहीम राबविणे आणि तक्रार निवारण यंत्रणा अधिक सक्षम करणे या मागण्यांचा समावेश आहे.

ग्राहकांची फसवणूक हा केवळ आर्थिक गुन्हा नसून ग्राहकांच्या विश्वासावर घाला घालणारा गंभीर प्रकार असल्याने प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन जिल्हाभर व्यापक तपासणी मोहीम राबवावी व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्राहक पंचायत, गडचिरोलीच्या जिल्हा पदाधिकारी प्रांत सदस्य चंद्रकांत पतरंगे,मार्गदर्शक विजय कोतपल्लीवार, उपाध्यक्ष विजय साळवे, सचिव अरुण पोगळे, महिला जिल्हा प्रमुख सुचिता धकाते, आशाताई कोकोडे, बळवंत येवले, एम. डी. मेश्राम,वतीने करण्यात आली आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker