आपला जिल्हाताज्या घडामोडी
कार्तिक स्वामी महाराजांच्या नावाचा गैरवापर केल्याचा आरोप फेटाळला
हरनघाट देवस्थान संचालन समितीचा पत्रकार परिषदेत खुलासा

गडचिरोली, प्रतिनिधी :-
चपराळा येथील श्री हनुमान मंदिर प्रशांत धाम ट्रस्टने उपस्थित केलेल्या विविध आक्षेपांवर श्री संत मुलीधर धाम कार्तिक स्वामी हनुमान मंदिर देवस्थान, हरनघाट (पारडी) संचालन समितीने सोमवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशन च्या पत्रकार परिषदेत समितीचे अध्यक्ष संत मुलीधर महाराज विठ्ठलवार गुज्जनवार यांनी कार्तिक स्वामी महाराजांच्या नावाचा किंवा छायाचित्राचा वापर करून देणग्या गोळा केल्याचे आरोप फेटाळून लावले.
समितीच्या वतीने सांगण्यात आले की, कार्तिक स्वामी महाराजांच्या नावाचा प्रसिद्धीसाठी अथवा आर्थिक लाभासाठी कधीही वापर करण्यात आलेला नाही. पावती पुस्तकांवर त्यांचे छायाचित्र छापल्याचा आरोपही निराधार असल्याचा दावा करण्यात आला. या संदर्भातील कोणताही पुरावा असल्यास तो सार्वजनिकरित्या सादर करावा, असे आव्हान समितीने केले.
गुरू-शिष्य परंपरेविषयी बोलताना संत मुलीधर महाराज यांनी कार्तिक स्वामी महाराजांना आपण गुरू मानत असल्याचे सांगितले. हिंदू धर्मपरंपरेनुसार कोणालाही गुरू मानण्याचा अधिकार प्रत्येकाला असल्याने या विषयावर आक्षेप घेण्याचे कारण नसल्याचे त्यांनी नमूद केले.



