ब्रह्मपुरी, प्रतिनिधी :-
बनावट ब्रँड स्टिकर लावून तसेच बनावट बिलबुकांच्या माध्यमातून वजनकाट्यांची विक्री करून ग्राहकांची फसवणूक केल्याचा प्रकार ब्रह्मपुरी तालुक्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी साई वेइंग स्केल, एस.ए. सर्व्हिसेस आणि एस.ए.आय. वेइंग सर्व्हिसेसचे संचालक आशिष मधुकर पारधी आणि सुरज मधुकर पारधी (रा. उदापूर, ता. ब्रह्मपुरी) यांच्यासह काही वजन-मापे व्यावसायिकांविरुद्ध तक्रारी दाखल करण्यात आल्या असून पोलीस आणि वैधमापन शास्त्र विभागाकडून चौकशी सुरू आहे.
तक्रारीनुसार, संबंधितांनी संगनमत करून ‘शार्प इन्स्ट्रुमेंट्स’ या कंपनीच्या नावाने बनावट बिलबुक छापल्याचा तसेच ‘टीएम सन्सुई’ या ब्रँडचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. नॉन-स्टँडर्ड आणि फॅब्रिकेटेड वजनकाट्यांवर नामांकित ब्रँडचे बनावट स्टिकर लावून त्यांची बाजारात विक्री करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाची दखल घेत ब्रह्मपुरी पोलीस आणि वैधमापन शास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त तपासणी मोहीम राबविली. तपासणीदरम्यान मोठ्या प्रमाणात नियमबाह्य व प्रमाणित निकषांची पूर्तता न करणारे वजनकाटे आढळून आले. त्यामुळे अंदाजे २०० हून अधिक मशीन जप्त करण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
प्राथमिक तपासात वैधमापन शास्त्र अधिनियम, २००९ मधील विविध तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्याने अधिक सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांकडून तसेच वैधमापन शास्त्र विभागाकडून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, संबंधित ब्रँड कंपन्यांच्या प्रतिनिधींनी ग्राहकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. वजनकाटे किंवा इतर वजन-मापे उपकरणे खरेदी करताना त्यावर वैध पडताळणी प्रमाणपत्र, स्टॅम्पिंग प्लेट, अधिकृत सील आणि आवश्यक कागदपत्रे असल्याची खात्री करावी, तसेच अधिकृत वितरकांकडूनच उत्पादने खरेदी करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
या कारवाईमुळे वजन-मापे क्षेत्रातील नियमबाह्य व्यवहार पुन्हा एकदा चर्चेत आले असून तपास पूर्ण झाल्यानंतर आणखी माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button