आपला जिल्हाताज्या घडामोडी

आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर व्यापक चर्चा;

खासदार मायाताई इवनाते यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक बैठक

गडचिरोली, प्रतिनिधी :-

आदिवासी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकासासंदर्भातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेली आदिवासी जमातीची सामाजिक बैठक राज्यसभा सदस्य मायाताई इवनाते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या पुढाकाराने आयोजित या बैठकीत विविध आदिवासी संघटना, ग्रामसभा प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधींनी सहभाग नोंदविला.

बैठकीच्या प्रारंभी राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल मायाताई इवनाते यांचा आदिवासी समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यानंतर समाजाच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

शिक्षण, रोजगार, वनहक्क आणि विकासाच्या मुद्द्यांवर विचारमंथन; २२ आदिवासी संघटना व ग्रामसभा प्रतिनिधींचा सहभाग

बैठकीत आदिवासी समाजासमोरील शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक आव्हाने, युवक-युवतींसाठी रोजगार व कौशल्य विकासाच्या संधी, वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, दुर्गम भागातील आरोग्य व शिक्षण सुविधा तसेच पायाभूत सुविधांच्या विकासासंबंधी मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यात आला.

बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा आणि ओळख जपत विकासाच्या मुख्य प्रवाहात समाजाला सक्षमपणे सहभागी करून घेण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी संघटितपणे काम करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

मायाताई इवनाते यांनी आदिवासी समाजाच्या अपेक्षा आणि मागण्या गांभीर्याने ऐकून घेत त्या संसदेच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले. समाजाच्या हक्क, विकास आणि सक्षमीकरणासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनीही आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांवर शासनस्तरावर प्रभावीपणे पाठपुरावा करण्याची भूमिका स्पष्ट केली. शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. देवाजी तोफा, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी मार्गदर्शन केले. बैठकीस माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ. देवराव होळी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, माधव गावळ, माजी जिल्हा परिषद सदस्य नंदू नरोटे यांच्यासह विविध आदिवासी संघटनांचे पदाधिकारी, ग्रामसभा प्रतिनिधी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विशेष म्हणजे, या बैठकीत २२ आदिवासी संघटना आणि विविध ग्रामसभांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्यामुळे समाजाच्या विविध प्रश्नांवर सामूहिकपणे चर्चा करून पुढील दिशा ठरविण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मिलिंद नरोटे यांनी केले. सूत्रसंचालन अमरसिंग गेडाम यांनी तर आभार प्रदर्शन पुष्पलता कुमरे यांनी केले.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker