आपला जिल्हाताज्या घडामोडीराजकीय

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कामगिरीचा भाजपकडून आढावा

सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण’ उपक्रमांची माहिती

गडचिरोली,प्रतिनिधी : –

भारतीय जनता पक्षाच्या गडचिरोली जिल्हा शाखेच्या वतीने शासकीय सर्किट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कारभारातील विविध योजनांचा आणि विकासकामांचा आढावा घेण्यात आला. राज्यसभा सदस्य मायाताई इवनाते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या पत्रकार परिषदेत केंद्र सरकारच्या ‘सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण’ या अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती देण्यात आली.

पत्रकार परिषदेत बोलताना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी २०१४ पासून केंद्र सरकारने पायाभूत सुविधा, सामाजिक कल्याण, महिला सक्षमीकरण, कृषी विकास आणि आदिवासी कल्याण या क्षेत्रांत विविध योजना राबविल्याचा दावा केला. या योजनांमुळे देशासह गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि आदिवासीबहुल जिल्ह्यांनाही विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यास मदत झाल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या विविध योजनांचा उल्लेख करताना पक्की घरे, शेतकरी सन्मान निधी, महिला सक्षमीकरणासाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांसह आदिवासी विकासासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीची माहिती देण्यात आली. आदिवासी भागांतील पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

देशातील पायाभूत सुविधांच्या विकासाचा उल्लेख करताना राष्ट्रीय महामार्गांचे विस्तारित जाळे, नवीन विमानतळांची उभारणी, वंदे भारत रेल्वे सेवा आणि नव्या संसद भवनाचा संदर्भ देण्यात आला. या प्रकल्पांमुळे देशाच्या विकासाला गती मिळाल्याचा दावा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

यावेळी खासदार डॉ. अशोक नेते, माजी आमदार डॉ. देवराव होळी, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, नगराध्यक्षा ॲड. प्रणोती निंबोरकर, ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, रमेश भुरसे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, पत्रकार परिषदेत मांडण्यात आलेले मुद्दे हे भारतीय जनता पक्षाच्या वतीने सादर करण्यात आलेले दावे असून विविध योजनांच्या परिणामकारकतेबाबत स्वतंत्र स्तरावर वेगवेगळी मते व्यक्त होत असतात.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker