आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी
विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार : आमदार मिलिंद नरोटे

उदय धकाते
गडचिरोली, प्रतिनिधी :-
गडचिरोली जिल्ह्यातील एकही विद्यार्थी पाठ्यपुस्तकांअभावी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी राज्याच्या शिक्षण मंत्र्यांकडे पाठपुरवठ्याबाबत तातडीने पाठपुरावा करणार असल्याची माहिती भाजप आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी दिली.
राज्यात बहुतांश ठिकाणी नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली असून विदर्भात ३० जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्य शासनामार्फत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे. मात्र, गडचिरोली जिल्ह्यात अद्याप काही विषयांची आवश्यक संख्येइतकी पाठ्यपुस्तके शाळांपर्यंत पोहोचलेली नसल्याची बाब डिजिटल महाभारत न्यूज ने आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या समोर आणली आहे.

यामुळे शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करताना शिक्षक व ग्रंथपालांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या पार्श्वभूमीवर आमदार नरोटे यांचे लक्ष वेधण्यात आले असता त्यांनी तातडीने या विषयात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.
“जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला सर्व विषयांची पाठ्यपुस्तके शाळेच्या पहिल्या दिवसापासून उपलब्ध व्हावीत, यासाठी शिक्षण मंत्र्यांना निवेदन देऊन आवश्यक पाठपुरवठा करण्याची मागणी करण्यात येईल. कोणताही विद्यार्थी पुस्तकांशिवाय राहणार नाही, यासाठी प्रयत्न केले जातील,” असे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी डिजिटल महाभारत न्यूज ला सांगितले.



