आपला जिल्हाकृषी व व्यापार

हरी ओम पाईप इंडस्ट्रीज व संबंधित दलालांची चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी

आदिवासी शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

गडचिरोली, प्रतिनिधी :-

चामोर्शी तालुक्यातील गहूबोडी-जामगिरी परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांची कथित दिशाभूल करून जमीन व्यवहार करण्यात आल्याचा आरोप करत संबंधित खासगी कंपनी व दलालांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीने केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.

जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांनी निवेदनाद्वारे म्हटले आहे की, गहूबोडी-जामगिरी परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांच्या अशिक्षितपणाचा व माहितीअभावी गैरफायदा घेत काही दलालांकडून जमिनी हस्तगत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. शासनाची कोणतीही अधिकृत अधिसूचना किंवा आदेश नसताना जमीन अधिग्रहणाच्या नावाखाली व्यवहार सुरू करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, काही व्यक्तींनी आगाऊ रक्कम देऊन जमिनींसंदर्भात करारनामे केले असून आतापर्यंत सुमारे १०० एकरांहून अधिक जमीन करारबद्ध करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. हे सर्व करारनामे तातडीने रद्द करून संपूर्ण व्यवहाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

मारोडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गहूबोडी गावातील ग्रामस्थांना विश्वासात न घेता जमीन अधिग्रहणासाठी ‘ना हरकत’ प्रमाणपत्र देण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला. या पार्श्वभूमीवर आयोजित विशेष ग्रामसभेत गावातील कोणतीही जमीन अधिग्रहित करण्यास मंजुरी देऊ नये, असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

याशिवाय शासनाची परवानगी मिळाल्याचे खोटे सांगून वारसदार व नातेवाईकांमध्ये मतभेद निर्माण करण्याचे प्रयत्न काही दलालांकडून होत असल्याचाही आरोप करण्यात आला. आदिवासींच्या हक्काच्या जमिनींचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून संबंधित करारनाम्यांची चौकशी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.

निवेदन सादर करताना परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, निकेश गद्देवार, सुधीर बांबोडे, राकेश तोरे, सूर्यकांत शेडमाके, देवाजी कुळमेथे, विशाल सोयाम, भगवान कुळमेथे, यशवंत कुळमेथे, रत्नदीप कुळमेथे, शुभम मडावी, भास्कर कुळमेथे, यमाजी कोडाप, नरेश कुळमेथे आणि नागराज कुळमेथे आदी उपस्थित होते.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker