आपला जिल्हाताज्या घडामोडी

अमेय सुरेश सावकार पोरेड्डीवार यांचे निधन; गडचिरोलीवर शोककळा

गडचिरोली, प्रतिनिधी :-

गडचिरोली शहराचे पहिले नगराध्यक्ष तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश सावकार पोरेड्डीवार यांचे सुपुत्र अमेय सुरेश सावकार यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. ते अवघे ३५ वर्षांचे होते. त्यांच्या अकाली निधनाच्या वृत्ताने गडचिरोली शहरासह सामाजिक, राजकीय व व्यावसायिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. अमेय सावकार यांच्या निधनाची बातमी समजताच नातेवाईक, मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी रुग्णालय व त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली.

अमेय सावकार हे शांत, मनमिळावू आणि सर्वांशी आपुलकीने वागणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. त्यामुळे त्यांच्या अकाली जाण्याने सावकार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मित्रपरिवारालाही मोठा धक्का बसला आहे.

कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमेय सावकार पोरेड्डीवार यांच्यावर उद्या सकाळी १०.३० वाजता गडचिरोली येथील कठाणी नदीवरील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यापूर्वी त्यांच्या निवासस्थान असलेल्या सावकार वाड्यातून सकाळी १० वाजता अंतिमयात्रा निघणार आहे.

सावकार कुटुंबाचे गडचिरोली शहराच्या सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात महत्त्वाचे योगदान राहिले आहे. अशा कुटुंबातील तरुण सदस्याच्या अचानक निधनामुळे संपूर्ण शहर हळहळ व्यक्त करीत आहे. विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांनी अमेय सावकार यांना श्रद्धांजली अर्पण करत सावकार परिवाराच्या दुःखात सहभागी असल्याची भावना व्यक्त केली आहे.

अमेय सावकार यांच्या पश्चात आई-वडील, कुटुंबीय आणि मोठा मित्रपरिवार असा आप्तस्वकीयांचा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने गडचिरोलीने एक उमदा, सुस्वभावी आणि आश्वासक तरुण गमावल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker