आपला जिल्हाताज्या घडामोडी

पालकमंत्री दोन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नेमकं लक्ष देईल कोण?; काँग्रेसकडून सरकारवर टीका

धान बोनस, एमआयडीसी, विमानतळ भूसंपादन, आरोग्य व शिक्षणाच्या प्रश्नांवर लक्ष देण्याची मागणी

गडचिरोली, प्रतिनिधी :-

गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी, विद्यार्थी, आरोग्य व्यवस्था आणि जमीन अधिग्रहणाच्या प्रश्नांकडे राज्य सरकार व जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांनी सरकारवर टीका केली आहे.

प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्यांनी म्हटले आहे की, जिल्ह्यातील अनेक शेतकरी एमआयडीसी आणि प्रस्तावित विमानतळासाठी होणाऱ्या जमीन अधिग्रहणामुळे चिंतेत आहेत. वडिलोपार्जित जमिनी गमावण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली असून त्यांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र या गंभीर विषयांकडे शासनाचे अपेक्षित लक्ष नसल्याचा आरोप त्यांनी केला.

धान बोनसची रक्कम अद्याप अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नसताना खरीप हंगाम तोंडावर आला आहे. त्यामुळे शेतीसाठी आवश्यक आर्थिक नियोजन कसे करायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकल्याचे त्यांनी नमूद केले. दुसरीकडे शाळा सुरू होण्याचा कालावधी जवळ आला असतानाही जिल्ह्यातील अनेक ग्रामीण व दुर्गम भागांत बससेवा नियमित नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. अनेक शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा, डॉक्टर व कर्मचाऱ्यांची कमतरता तसेच अपुऱ्या वैद्यकीय सुविधांमुळे नागरिकांना वेळेवर उपचार मिळत नसल्याचा दावा त्यांनी केला.

राज्य सरकार गडचिरोलीला ‘स्टील हब’ बनविण्याच्या घोषणा करत असताना जिल्ह्यातील नागरिकांना मूलभूत आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि शेतकरी प्रश्नांवर समाधानकारक उपाय मिळत नसल्याची टीकाही त्यांनी केली.

शेतकऱ्यांचे धान बोनस तातडीने वितरित करावे, विद्यार्थ्यांसाठी नियमित बससेवा उपलब्ध करावी, एमआयडीसी व विमानतळासाठी होणाऱ्या जमीन अधिग्रहणाबाबत शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घ्याव्यात तसेच आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी दूर कराव्यात, अशी मागणी कोवासे यांनी केली आहे.

या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास काँग्रेसच्या वतीने तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker