आपला जिल्हाक्राईमताज्या घडामोडी

शिवणी येथे अवैध देशी दारूचा साठा जप्त

गडचिरोली, प्रतिनिधी :-

दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अवैधरित्या दारूची विक्री व साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी पुन्हा एकदा धडक कारवाई केली आहे. शिवणी परिसरातील एका शेतातील फार्महाऊसवर टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी देशी दारूचा मोठा साठा जप्त केला असून सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध दारूविक्रीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे १७ जून रोजी मौजा शिवणी येथे ही कारवाई करण्यात आली.

माहितीनुसार, किरण शंकर ताडपल्लीवार (वय ३७, रा. शिवणी) याने आपल्या शेतातील फार्महाऊसमध्ये अवैधरित्या देशी दारूचा साठा करून ठेवला होता. पोलिसांनी पंचांसमक्ष तपासणी केली असता घराच्या परिसरात जमिनीखाली बांधलेल्या सिमेंटच्या टाकीत मोठ्या प्रमाणात दारूचा साठा आढळून आला. पोलिसांची चाहूल लागताच हा साठा पेटवून नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, तपासणीदरम्यान ९० मिली क्षमतेच्या अर्धवट जळालेल्या सुमारे २,००० निपा पोलिसांच्या हाती लागल्या.

या कारवाईत एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील दारूबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अवैध दारू साठवणूक, विक्री व वाहतुकीची माहिती नागरिकांनी तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वात गडचिरोली पोलिसांच्या पथकाने केली.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker