आपला जिल्हाक्राईमताज्या घडामोडी

११ वर्षांपासून फरार नक्षल समर्थक आरोपी अटकेत

खून, खुनाचा प्रयत्न आणि शासकीय कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या गुन्ह्यांमध्ये होता सहभाग

गडचिरोली, प्रतिनिधी :-

माओवादविरोधी अभियानांतर्गत गडचिरोली पोलिसांनी आणखी एक महत्त्वपूर्ण यश संपादन करत तब्बल ११ वर्षांपासून फरार असलेल्या नक्षल समर्थक आरोपीला अटक केली आहे. खून, खुनाचा प्रयत्न, शासकीय सेवकांवर हल्ला आणि शासकीय मालमत्तेची तोडफोड अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या या आरोपीला नियोजनबद्ध कारवाईत ताब्यात घेण्यात आले.

पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात माओवादविरोधी मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत असून, त्याच मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेला आरोपी बापू व्यंकटी जनगम (रा. नडीकुडा) हा पोलीस अभिलेखावरील ग्राम रक्षक दल (GRD) यादीतील असून, माओवाद्यांना मदत करणाऱ्या जनमिलिशिया संघटनेशी संबंधित असल्याची नोंद आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बापू जनगम हा अनेक वर्षांपासून फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत होती. दरम्यान, तो आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी नडीकुडा येथे आल्याची गोपनीय माहिती असरअल्ली पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गावाला घेराव घालून शोधमोहीम राबविली. शेतशिवार परिसरात आरोपी आढळून येताच पोलिसांनी शिताफीने कारवाई करून त्याला अटक केली.

विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग

अटक करण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध असरअल्ली पोलीस ठाण्यात विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये मनुष्यवध, खुनाचा प्रयत्न, शासकीय सेवकांवर हल्ला, दंगल, तोडफोड तसेच खुनाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे २०१५ मध्ये दाखल झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात (कलम ३०२) तो गेली ११ वर्षे फरार होता. या प्रकरणातील एका सहआरोपीला यापूर्वीच गडचिरोली सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

सातत्यपूर्ण शोधमोहीमेला यश

दीर्घकाळ फरार असलेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती संकलन आणि स्थानिक स्तरावरील माहितीचा प्रभावी वापर केला. आरोपीच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून अखेर त्याला अटक करण्यात यश आले.

अटक केलेल्या आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी हर्षवर्धन बी. जे., पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, सिरोंचा संदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली असरअल्ली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी योगिराज जाधव, पोउपनि प्रसाद पवार तसेच पोलिसांच्या पथकाने पार पाडली.

गडचिरोली जिल्ह्यात माओवादाचा प्रभाव लक्षणीयरीत्या कमी होत असताना पोलिसांनी केलेली ही कारवाई माओवादविरोधी लढ्यातील आणखी एक महत्त्वाची कामगिरी मानली जात आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker