गडचिरोली, प्रतिनिधी :
दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू तस्करीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे ११ लाख ५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पेंढरी उपपोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचून ही कारवाई केली. यामध्ये मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी मद्याचा साठा तसेच दारू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे स्कॉर्पिओ वाहन जप्त करण्यात आले.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध दारू विक्री व वाहतुकीविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. त्याअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, कोरची तालुक्यातील बेडगाव येथील लखन जोहारी भैसा हा आपल्या साथीदारांसह स्कॉर्पिओ वाहनातून अवैध दारूचा साठा पेंढरी परिसरातील चिल्लर विक्रेत्यांना पुरवण्यासाठी घेऊन येत असल्याची माहिती मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी मंगेवाडा–पेंढरी मार्गावर दोन पंचांच्या उपस्थितीत सापळा रचला. संशयित स्कॉर्पिओ वाहन दिसताच पोलिसांनी ते थांबविण्याचा इशारा दिला. वाहन थांबल्यानंतर चालकाच्या शेजारी बसलेले दोन जण अंधाराचा व शेतशिवाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले. मात्र चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.
वाहनातून मोठा मद्यसाठा जप्त
तपासणीदरम्यान स्कॉर्पिओमधून विविध ब्रँडच्या मद्याच्या शेकडो बाटल्या आढळून आल्या. यामध्ये रॉयल स्टॅग व्हिस्की, माऊंट 6000 बिअर, लेमाऊंट बिअर, मॅकडॉवेल्स नंबर वन रिझर्व व्हिस्की तसेच गोवा व्हिस्कीचा मोठा साठा होता. जप्त मद्याची किंमत सुमारे ४ लाख ५ हजार ८०० रुपये असून, स्कॉर्पिओ वाहनाची अंदाजित किंमत ७ लाख रुपये आहे. अशा प्रकारे एकूण ११ लाख ५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
तिघांविरुद्ध गुन्हा
या प्रकरणी पेंढरी उपपोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी लखन जोहारी भैसा (रा. बेडगाव, ता. कोरची) याच्यासह फरार आरोपी निर्मल धमगाये आणि तरुण धमगाये (दोघेही रा. कोरची) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम जाधव करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा आणि अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात पार पडली.
दारूबंदी जिल्ह्यात अवैध मद्य तस्करीविरोधात पोलिसांनी उचललेले हे पाऊल महत्त्वाचे मानले जात असून, अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहतील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button