गडचिरोलीतील मध्यवर्ती तलावात शेकडो माशांचा मृत्यू
दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त

गडचिरोली, प्रतिनिधी :-
गडचिरोली शहराच्या मध्यवर्ती भागातील तलावात शेकडो मासे मृतावस्थेत आढळून आल्याची घटना रविवारी उघडकीस आली. तलावाच्या पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणात मृत मासे तरंगताना दिसल्याने परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली. या घटनेमुळे तलाव परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
मृत माशांमध्ये सवडा, कतला, रोहू आदी जातींचा समावेश असून त्यांचे वजन सुमारे पाच ते पंधरा किलोपर्यंत असल्याचे सांगण्यात आले. माशांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
प्रशासनाने मृत माशांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले असून अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण घटणे, प्रदूषण किंवा अन्य कारणांमुळे ही घटना घडली असण्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी अधिकृत कारण तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
या घटनेमुळे तलावात मच्छीमारी करणाऱ्या भोई समाजातील मत्स्यव्यवसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच तलाव परिसरात पसरलेल्या दुर्गंधीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून मृत मासे तातडीने हटवून परिसराची स्वच्छता करण्याची मागणी नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाकडे केली आहे.



