ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
१४ आत्मसमर्पित माओवाद्यांना भूखंडांचे वाटप
धनादेश, सायकल, शैक्षणिक साहित्य व वाहनचालक परवान्यांचेही वितरण
गडचिरोली, प्रतिनिधी :-
हिंसाचाराचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा निर्णय घेतलेल्या आत्मसमर्पित माओवादी सदस्यांच्या पुनर्वसनाला गडचिरोली पोलीस दलाने आणखी गती दिली आहे. ‘प्रोजेक्ट संजीवनी’अंतर्गत मंगळवारी (दि. १ सप्टेंबर) १४ आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना भूखंडांचे वितरण करण्यात आले. यासोबतच पुनर्वसन निधीचे धनादेश, मुलांना सायकल व शैक्षणिक साहित्य तसेच वाहनचालक परवान्यांचेही वितरण करण्यात आले.
गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नांमुळे आतापर्यंत ८१९ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या आत्मसमर्पण व पुनर्वसन योजनेअंतर्गत आत्मसमर्पित सदस्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भूखंड, घरकुल, रोजगार, आरोग्य, शिक्षण आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून मदत केली जात आहे.
जिल्हा प्रशासन आणि गडचिरोली पोलीस दलाच्या समन्वयातून आत्मसमर्पित माओवादी सदस्यांसाठी आतापर्यंत १७४ भूखंड मंजूर झाले असून, त्यापैकी १५३ भूखंडांचे यापूर्वी वितरण करण्यात आले आहे. मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात आणखी १४ जणांना भूखंडाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
पुनर्वसन निधीसह विविध साहित्यांचे वाटप
कार्यक्रमात आत्मसमर्पित सदस्यांना केंद्र व राज्य शासनाकडून पुनर्वसनासाठी मिळणाऱ्या निधीचे धनादेश देण्यात आले. त्यांच्या मुलांना सायकल व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच काही आत्मसमर्पित सदस्यांना वाहनचालक परवान्यांचे वितरण करण्यात आले.




