ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विदर्भातील पुरातन बालाजी घोडा यात्रेला चिमूरमध्ये उत्साहात प्रारंभ

चंद्रपूर, प्रतिनिधी :-

“चंद्रपूरचा वडा, ब्रह्मपुरीचा जोडा आणि बालाजीचा घोडा” अशी ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील ऐतिहासिक चिमूर येथील श्रीहरी बालाजी देवाची वार्षिक घोडा रथयात्रा आज मोठ्या उत्साहात सुरू झाली. काळाच्या ओघात चंद्रपूरचा वडा व ब्रह्मपुरीचा जोडा इतिहासजमा होत असताना, चिमूरचा बालाजी घोडा मात्र सुमारे तीनशे वर्षांची दिमाखदार परंपरा आजही जिवंत ठेवून आहे.

स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाचे क्रांतीस्थळ म्हणून ओळख असलेले चिमूर शहर धार्मिकदृष्ट्याही तितकेच समृद्ध आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वी चिमूर येथील भिकाजी पाटील डाहुले यांच्या घराच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू असताना, त्यांना एक अत्यंत सुबक आणि पुरातन श्री बालाजीची मूर्ती सापडली. या स्वयंभू मूर्तीची श्रद्धेने स्थापना करून त्या ठिकाणी एक छोटे मंदिर उभारण्यात आले. कालांतराने मंदिराची महती वाढत गेली आणि भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली.

पेशव्यांचे सरदार व इतिहासातील साडेतीन शहाण्यांपैकी एक असलेले देवाजीपंत चोरघडे यांनी या मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या देखभालीसाठी निधी मंजूर केला. नागपूरकर जानोजीराजे भोसले यांच्या सहकार्याने भव्य मंदिराची उभारणी करण्यात आली आणि त्याच काळात श्रीहरी बालाजी देवाची वार्षिक घोडा यात्रा सुरू झाली.

माघ महिन्यात भरवली जाणारी ही यात्रा विदर्भातील धार्मिक पर्यटनाचे वैभव अधोरेखित करते. यात्रेच्या पहिल्या दिवशी श्रीहरी बालाजी देवाचा महाभिषेक करण्यात येतो. त्यानंतर मध्यरात्री ठीक १२ वाजता जयघोषात बालाजी देवाची मूर्ती भव्य लाकडी घोडारूपी रथावर आरूढ केली जाते. मध्यरात्री सुरू होणारी ही रथयात्रा संपूर्ण चिमूर शहराचे भ्रमण करून पहाटे काकडआरतीच्या सुमारास पुन्हा मंदिरात प्रवेश करते.

आरतीनंतर १५ दिवस चालणाऱ्या यात्रेला विधिवत सुरुवात होते. महाशिवरात्रीच्या दिवशी गोपाळकाला करून या ऐतिहासिक आणि श्रद्धेने भारलेल्या उत्सवाची सांगता होते. शेकडो वर्षांची परंपरा जपणारी ही बालाजी घोडा यात्रा आजही भाविकांच्या श्रद्धेचे केंद्रबिंदू ठरली आहे.

 

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker