‘आत्मकथा राष्ट्रसंताची’ नाटिकेद्वारे गुरुदेव विद्यालय महोत्सवाचा समारोप
गडचिरोली, प्रतिनिधी :-
गुरुदेव विद्यालयाच्या वतीने वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन दिनांक २८ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या कालावधीत करण्यात आले आहे.
महोत्सवाच्या प्रारंभी २८ जानेवारीपासून आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये कबड्डी, खो-खो, लगोरी, भोवरा तसेच विविध मैदानी खेळ घेण्यात आले. यासोबतच बुद्धिबळ, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा, गायन आदी विविध सांस्कृतिक व बौद्धिक स्पर्धांचाही समावेश होता.
या महोत्सवात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. तसेच पालकांचा आनंदमेळावा हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले असून, पालकांनी विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला.
दिनांक ४ फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे महोत्सवाचा समारोप होणार असून, यावेळी गुरुदेव विद्यालय निर्मित “आत्मकथा राष्ट्रसंताची” ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर आधारित नाटिका विद्यार्थ्यांकडून सादर केली जाणार आहे.
या नाटिकेचा लाभ घेण्यासाठी गुरुदेव भक्त व रसिक मंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. गीता पाटील यांनी केले आहे.



