आपला जिल्हा

स्थानिक कंत्राटदारांनाच प्राधान्य मिळावे

दक्षिण गडचिरोली दंडकारण्य कंत्राटदार संघटनेची मागणी

गडचिरोली, प्रतिनिधी –

गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय रस्ते व इतर बांधकामांची कामे ही जिल्ह्यातील स्थानिक कंत्राटदारांनाच दिली जावीत, अशी ठाम मागणी दक्षिण गडचिरोली दंडकारण्य कंत्राटदार संघटनेने केली आहे. बांधकाम विभागाची हुकूमशाही खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही संघटनेचे सल्लागार डॉ. प्रणय खुणे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील स्थानिक कंत्राटदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून डांबर प्लांट उभारले आहेत, आधुनिक मशिनरी खरेदी केली असून स्थानिकांना रोजगारही पुरवले आहेत. मात्र, सध्या एका अनुभवहीन बाह्य कंपनीने माजी अभियंता आणि काही बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांच्या संगनमताने स्थानिक कंत्राटदारांची कामे बळकावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.

या कंपनीच्या माध्यमातून बोगस कामे सुरू करून राज्याचे मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मलीन करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. हे अन्यायकारक प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असे संघटनेने स्पष्ट केले.

डॉ. प्रणय खुणे यांनी सांगितले की, वेळ आल्यास स्थानिक कंत्राटदार रस्त्यावर उतरतील, उपोषण व चक्काजामसुद्धा करू शकतात. जिल्ह्यात नुकतीच निघालेली पाच कंत्राटे रद्द करावीत, अशीही मागणी करण्यात आली आहे. हे सर्व प्रश्न राज्य शासनासमोर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडले जाणार आहेत.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष साईनाथ बोंम्मावार, सचिव अरुण मुक्कावार, मार्गदर्शक अरविंद कात्रटवार, नाना नाकाडे, सल्लागार नितीन वायलालवार, अध्यक्ष धनंजय पडिशाला, सहसचिव राकेश गुब्बावार, प्रवक्ता अश्विन मेड्डीवार, गौतम अधिकारी, राजू मेहता, अजय तुम्मावार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker