नांदेड, प्रतिनिधी :-
नांदेड येथे ६ एप्रिलपासून सुरू झालेल्या राज्यस्तरीय आंतरजिल्हा गट ‘अ’ फुटबॉल स्पर्धेत गडचिरोली जिल्हा फुटबॉल संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले. बुधवारी झालेल्या अंतिम सामन्यात गडचिरोली संघाने अमरावती संघाचा पराभव करत हा किताब आपल्या नावावर केला.
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या वतीने आयोजित या स्पर्धेत नंदुरबार, लातूर, बीड, नांदेड, गोंदिया, अमरावती, गडचिरोली आणि सोलापूर या आठ संघांनी सहभाग घेतला होता.
गडचिरोली संघाने पहिल्याच सामन्यात नंदुरबार संघावर ५-१ असा दणदणीत विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यानंतर उपांत्य फेरीत नांदेड संघाचा २-० असा पराभव करून अंतिम फेरीत मजल मारली. अंतिम सामन्यात अमरावती संघावर मात करत गडचिरोलीने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
या यशाबद्दल गडचिरोली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र दरेकर, सचिव सतीश पवार तसेच तांत्रिक सल्लागार विजय सुपारे यांनी संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक प्रशांत मलिक आणि व्यवस्थापक एम. एस. सरकार यांचे अभिनंदन केले.
तसेच संघातील खेळाडूंना कोचिंग सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल लॉईड मेटल, एटापल्ली यांचेही विशेष आभार व्यक्त करण्यात आले.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button