ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रदूषण नियंत्रणासाठी गोंडवाना विद्यापीठाचा पुढाकार; तज्ज्ञ समिती गठित

गडचिरोली, प्रतिनिधी :-

चंद्रपूर महानगर व परिसरातील वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी गोंडवाना विद्यापीठाने महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. यासाठी विषय तज्ज्ञांची समिती गठित करण्यात आली असून, समितीची पहिली बैठक १० एप्रिल रोजी स्थानिक जनता महाविद्यालयात पार पडली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे होते. यावेळी सल्लागार परिषदेचे सदस्य संदीप पोशट्टीवार, सिनेट सदस्य संजय रामगिरवार, विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. अशोक मिस्त्री, विषय तज्ज्ञ डॉ. योगेश दुधपचारे, प्रा. सुरेश चोपणे, बंडू धोतरे, डॉ. महेंद्र ठाकरे, डॉ. राजीव वेगीनवार, डॉ. राजेश पेचे तसेच निमंत्रक म्हणून डॉ. आशिष महातळे उपस्थित होते.

विद्यापीठ कायद्यानुसार स्थानिक, प्रादेशिक व राष्ट्रीय समस्यांच्या सोडवणुकीसाठी योगदान देणे आणि ज्ञानाचा उपयोग समाजाच्या विकासासाठी करणे ही विद्यापीठाची जबाबदारी आहे. त्यानुसार, २४ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या अधिसभेत चंद्रपूर परिसरातील प्रदूषण नियंत्रणासाठी पुढाकार घेण्याचा ठराव संजय रामगिरवार यांनी मांडला होता. तो सर्वानुमते मंजूर झाल्यानंतर या समितीची स्थापना करण्यात आली.

या समितीमार्फत चंद्रपूर शहर व परिसरातील प्रदूषणाची कारणे शोधून त्यावर उपाययोजना सुचविणारा अद्ययावत आणि अभ्यासपूर्ण अहवाल तयार केला जाणार आहे. तसेच पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.

बैठकीत सर्व सदस्यांनी सविस्तर मते मांडत उपयुक्त सूचना दिल्या. प्रास्ताविक संजय रामगिरवार यांनी केले, तर डॉ. मनीष उत्तरवार यांनी आभार मानले. शेवटी प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांनी समारोप केला.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker