आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वृत्तपत्र उद्योग वाचवा! ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे मुख्यमंत्र्यांना साकडे

गडचिरोली, प्रतिनिधी :-

लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जाणारा वृत्तपत्र उद्योग सध्या वाढत्या महागाईमुळे आणि आर्थिक संकटामुळे अस्तित्वाच्या लढाईत सापडला आहे. कागद, मुद्रण साहित्य आणि विजेच्या दरात झालेल्या प्रचंड वाढीमुळे राज्यातील लघु व मध्यम वृत्तपत्रे बंद पडण्याच्या उंबरठ्यावर आहेत.

या पार्श्वभूमीवर ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ गडचिरोली जिल्हा शाखेच्या वतीने सोमवार, ६ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, सन २०१९ पासून कागद व मुद्रण साहित्याच्या दरात सुमारे १५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, शासनाच्या जाहिरात दरात कोणतीही तशी वाढ झालेली नसल्याने वृत्तपत्र उद्योग आर्थिक अडचणीत सापडला आहे. परिणामी, अनेक लघु व मध्यम वृत्तपत्रांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने शासनासमोर काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये शासकीय जाहिरात दरात किमान १५० टक्के वाढ करणे, जाहिरातींची बिले ३० दिवसांच्या आत अदा करणे व विलंब झाल्यास व्याज देणे, लघु व मध्यम वृत्तपत्रांना जाहिरात वाटपात समान संधी देणे, १० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या पत्रकारांना अधिस्वीकृती (Accreditation) देणे तसेच २० वर्षे सेवा व ५५ वर्षे वय पूर्ण झालेल्या पत्रकारांसाठी पेन्शन योजना लागू करणे यांचा समावेश आहे.

तसेच सर्व शासकीय ई-टेंडर व जाहिराती पूर्ण स्वरूपात प्रसिद्ध करण्याची सक्ती करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

https://x.com/i/status/2041209696863039842

निवेदन देताना ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे विदर्भ विभाग तसेच गडचिरोली जिल्हाध्यक्ष व्यंकटेश दुडमवार, राज्य कार्यकारिणी सदस्य (साप्ताहिक विंग) मुकुंद जोशी, रेखा वंजारी, संगीता विजयकर, तिलोत्तमा हाजरा, प्रकाश ताकसांडे, शहराध्यक्ष सुरज हजारे, शहर सरचिटणीस निलेश सातपुते आणि हितेश ठेंगे आदी उपस्थित होते.

“वृत्तपत्र उद्योग मजबूत राहिला तरच लोकशाही आणि जनतेच्या अधिकारांचे संरक्षण शक्य आहे,” अशी भावना यावेळी उपस्थित पत्रकारांनी व्यक्त केली. राज्य सरकार या संकटग्रस्त उद्योगाला कोणता दिलासा देते, याकडे आता संपूर्ण माध्यमांचे लक्ष लागले आहे. 

 

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker