आरमोरी, प्रतिनिधी :-
महाराष्ट्रात गाजत असलेल्या प्रकाश खरात प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत असून, या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकपा) कठोर कारवाईची मागणी केली आहे. देव, धर्म आणि आध्यात्मिकतेच्या नावाखाली महिलांची व नागरिकांची फसवणूक करणाऱ्या अशोक खरात व त्याला साथ देणाऱ्या लोकप्रतिनिधींवर तात्काळ कारवाई करावी, या मागणीसाठी माकपाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात आले.
गडचिरोली जिल्हा माकपाच्या वतीने आरमोरी येथे मुख्यमंत्री यांना तहसीलदारामार्फत निवेदन देण्यात आले.
या निवेदनात भोंदू बाबा अशोक खरात व त्याच्या सर्व साथीदारांवर कठोर कारवाई करावी, तसेच त्याची संपूर्ण मालमत्ता जप्त करून ती अंधश्रद्धा निर्मूलनासाठी वापरावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणात ३९ आमदार सामील असल्याचे समोर येत असल्याने त्यांची नावे जाहीर करून त्यांच्या सहभागाचे स्वरूप जनतेसमोर आणावे व संबंधित आमदारांचे तत्काळ राजीनामे घ्यावेत, अशी ठाम भूमिका मांडण्यात आली.
तसेच, या प्रकरणात बळी पडलेल्या महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत असल्याने त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचत आहे. त्यामुळे असे व्हिडिओ तात्काळ हटवावेत, अशी मागणीही करण्यात आली.
राज्यात विविध ठिकाणी भोंदू बाबांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, त्यांच्यावर आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करावा, जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी तसेच सोशल मीडियावर अंधश्रद्धा पसरवणाऱ्या जाहिरातींवर बंदी आणावी, अशा विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.
निवेदन देताना माकपा जिल्हा सचिव कॉ. अमोल मारकवार, प्रशांत खोब्रागडे, संजय वाकडे, दशरथ मेश्राम, प्रमोद कोसेकर, रमेश मेश्राम, अर्चना मारकवार, शिला खांडेकर, सपना खोब्रागडे आदी उपस्थित होते.
Back to top button