अहेरी, प्रतिनिधी :-
नगरपंचायत अहेरी येथे स्ट्रीट व्हेंडर्सवर करण्यात आलेल्या विनानोटीस अतिक्रमण कारवाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पार्टी (भाकपा) तर्फे सुरू असलेले उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. उप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाने मुख्याधिकाऱ्यांना सात दिवसांच्या आत स्पष्ट लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
उप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाने आंदोलनकर्त्यांना वेळ देत “न्याय केला जाईल” असे आश्वासन दिले. या आश्वासनाचा मान राखत भाकपाने उपोषण स्थगित केले असल्याचे सांगण्यात आले.
रुग्णालय रोड व दानशूर चौक परिसरातील स्टॉलधारकांवर नगरपंचायतीकडून करण्यात आलेल्या कारवाईविरोधात भाकपा व स्थानिक विक्रेत्यांनी आंदोलन छेडले होते. कोणतीही पूर्वसूचना न देता व्यवसाय हटविण्यात आल्याने विक्रेत्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली होती.
वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून कोणतेही ठोस उत्तर मिळाले नसल्यामुळे भाकपाने उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता. अखेर या आंदोलनाची दखल घेत उप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाने हस्तक्षेप करत मुख्याधिकाऱ्यांना सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
भाकपाचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांनी सांगितले की, दिलेल्या मुदतीत समाधानकारक निर्णय न झाल्यास व स्टॉलधारकांना पुन्हा त्याच ठिकाणी व्यवसाय करण्याची परवानगी न मिळाल्यास आंदोलन पुन्हा तीव्र करण्यात येईल. तसेच, विक्रेत्यांच्या उपजीविकेचा प्रश्न प्रलंबित राहिल्यास व्यापक जनआंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button