ताज्या घडामोडी

राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनाच्या अध्यक्षपदी ॲड. पारोमिता गोस्वामी

चंद्रपूर, प्रतिनिधी :-

राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समिती व तेलंगण राज्यातील श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने गोयेगाव (मंडल–केरामेरी, जि. आसिफाबाद, तेलंगण) येथे येत्या ७ व ८ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या २० व्या राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध समाजसेविका, लेखिका व विचारवंत ॲड. पारोमिता गोस्वामी यांची निवड करण्यात आली आहे.

हे दोन दिवसीय संमेलन गोयेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात पार पडणार असून स्थानिक ग्रामस्थ, युवक व महिला मंडळाच्या सहकार्याने आयोजन करण्यात आले आहे.

संमेलनात राष्ट्रसंत साहित्य दिंडी, उद्घाटन सोहळा, विशेष पुरस्कार वितरण, ग्रामगीतावर आधारित परिसंवाद, प्रबोधन संध्या, खंजिरी कीर्तन, ध्यानपाठ, सामुदायिक प्रार्थना, योग-प्राणायाम मार्गदर्शन, स्वच्छता अभियान, श्रमदान तसेच समारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील विविध भागांतील साहित्य अभ्यासक, लेखक, प्रबोधनकार व लोककलावंत या संमेलनात सहभागी होणार आहेत.

संमेलनाध्यक्ष ॲड. पारोमिता गोस्वामी या कायद्याच्या पदवीधर असून त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई येथून सामाजिक कार्य विषयात एम.ए. पदवी प्राप्त केली आहे. त्या ‘श्रमिक एल्गार’ या असंघटित ग्रामीण मजूर संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष तसेच ‘एल्गार प्रतिष्ठान’च्या संस्थापक सचिव आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी चळवळीचे नेतृत्व, वनहक्क धारकांचे प्रश्न, आदिवासी व ग्रामीण मजुरांचे हक्क, महिला मजुरांचे किमान वेतन व सामाजिक सुरक्षेसाठी त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांना देश-विदेशातील प्रतिष्ठित फेलोशिप तसेच अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले असून त्यांचे तीन ग्रंथ प्रकाशित झाले आहेत.

त्यांच्या निवडीबद्दल राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद व श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker