आपला जिल्हा
रस्ते सुरक्षा नियोजनासाठी नागरिकांच्या मतांना प्राधान्य -जिल्हाधिकारी
अपघात टाळण्यासाठी कठोर उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश

गडचिरोली,प्रतिनिधी :-
जिल्ह्यातील वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रभावी नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे तातडीने करता येणाऱ्या अल्पकालीन व दीर्घकालीन व्यापक उपाययोजनांमध्ये नागरिकांच्या सूचना, अनुभव व मतांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी स्पष्ट केले.
नियोजन भवन येथे जिल्हा रस्ते सुरक्षा समितीची बैठक आज जिल्हाधिकारी पंडा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत अपघात नियंत्रणासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची सखोल चर्चा करण्यात आली. आमदार डॉ. मिलींद नरोटे, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता निता ठाकरे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ यासारख्या गंभीर अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या बाबींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. जिल्हा नियोजन विकास निधीतून अपघात प्रवण स्थळांवर सुधारणा करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यातून उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांमार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या कामांची माहिती विचारण्यात आली व आगामी आठवड्याभरात संबंधित कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी त्रयस्त संस्थेमार्फत चौकशी केली जाणार आहे. नागरिकांनी दिलेल्या सूचना आणि माहितीच्या आधारे प्रत्यक्ष स्थळांची पाहणी करून उपाययोजना निश्चित करण्यात येतील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.
नागरिकांच्या सूचना
बैठकीत नागरिकांनी आपल्या अभिप्रायांतून अनेक महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले. शहरातील वाढती जड वाहतूक रोखण्यासाठी रिंग रोडची आवश्यकता, रविवारच्या आठवडी बाजाराच्या दिवशी आणि शालेय वेळात शहरातील मोठ्या वाहनांची वाहतूक बंद ठेवणे, मोठ्या इमारतींसाठी स्वतंत्र पार्किंगची सक्ती, रस्त्यालगतचे अतिक्रमण हटविणे, वनक्षेत्रातील रस्त्यांवर वाहन चालकांना सावध राहण्याबाबत फलक लावणे, झाडांची छाटणी करणे, गतिरोधक बसवणे, दारू सेवन करून वाहन चालवणाऱ्यांवर नियमित कारवाई करणे, बस स्थानकाजवळ यू-टर्न बंदी, महामार्गालगत ट्रकसाठी स्वतंत्र पार्किंग सुविधा उपलब्ध करणे, दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती, रस्त्यावर भटक्या जनावरांची व्यवस्था, चामोर्शी येथील मुख्य रस्त्यावरील बस स्थानक समोर स्थलांतरित करणे, गडचिरोली-आरमोरी मार्गावरील खड्डे बुजवणे तसेच आरमोरी शहरात वाहनाची गती कमी करण्यासाठी गतिरोधकाचे काम करणारे रिव्हर्स ट्रिप लावण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या.




