आपला जिल्हानिवडणूक
भाजपचे प्रशांत वाघरे यांची निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती, बंटी बांगडिया निवडणूक रंगणार
भाजपमध्ये पुन्हा निष्ठावंतांना मान

गडचिरोली, प्रतिनिधी :-
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख पदांच्या नियुक्त्या जाहीर केल्या असून, यात दोन महत्त्वाच्या नावांचा समावेश आहे. माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांची जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून आणि चिमूरचे भाजपा आमदार बंटी बांगडिया यांची जिल्हा निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
काही महिन्यांपूर्वी प्रशांत वाघरे यांना जिल्हाध्यक्षपदातून मुक्त करण्यात आले होते. मात्र आता त्यांनाच परत जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाच्या राजकीय लढाईची धुरा देण्यात आली आहे. यामुळे जुन्या, निष्ठावान आणि जमीन-स्तरावर कार्य केलेल्या कार्यकर्त्यांना भाजपा पुन्हा मान देत आहे, असे स्पष्टपणे दिसून येत आहे. वाघरे यांच्या दीर्घकालीन संघटन कौशल्याचा आणि कार्यकर्त्यांवरील पकडीचा विचार करूनच ही जबाबदारी देण्यात आल्याचे मानले जाते.
दुसरीकडे, आमदार बंटी बांगडिया यांच्या नियुक्तीमुळे निवडणूक आणखी रंगतदार होणार आहे. तब्बल १५ वर्षांपूर्वी त्यांनी शिवसेनेतील नाराज गटाला एकत्र करून नगरपरिषद आणि जिल्हा परिषदेत युवाशक्ती संघटनेद्वारे सत्ता मिळविली होती. गडचिरोलीतील त्यांचा हा पहिलाच मोठा राजकीय विजय होता आणि त्याच ठिकाणी आता पुन्हा त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी येत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
भाजपच्या या नियुक्त्या पाहता पक्षात जुने, सक्षम आणि अनुभवी कार्यकर्ते पुन्हा केंद्रस्थानी येत असल्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. स्थानिक पातळीवरील संघटन, नाराजीचे निराकरण आणि निवडणूक व्यवस्थापन यासाठी हा पथकबदल निर्णायक ठरणार आहे, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.





