सेवानिवृत्तकांना कंत्राटी ‘विमाशि संघाचे’ २१ जुलैला विदर्भस्तरीय धरणे आंदोलन


राज्यातील खाजगी व स्थानिक स्वराज्य संस्थाअतर्गत संचालित प्राथमिक/ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा खाजगी आश्रम शाळेतील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. या प्रलंबित समस्या सोडविण्याकरीता नागपूर व अमरावती शिक्षण उपसंचालक यांचे कार्यालयासमोर तसेच विदर्भातील सर्व शिक्षणाधिकारी (माध्य.) यांचे कार्यालयासमोर २१ जुलै २०२३ रोजी दुपारी ३ ते ५ वाजेदरम्यान धरणे-निदर्शने आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री, आदिवासी विकास मंत्री व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री यांना पाठविण्यात आलेले आहे.
धरणे-निदर्शने आंदोलनात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती करण्याबाबत काढलेले परिपत्रक रद्द करून सुशिक्षीत बेरोजगारांची नियुक्ती करावी. तसेच अनेक जिल्हा परिषद शाळेमध्ये घड्याळी तासिका तत्वावर कार्यरत सुशिक्षीत बेरोजगारांचे या रिक्त पदांवर समायोजन करण्यात यावे आदी मागण्यासह हे धरणे आंदोलन होणार आहे.
२१ जुलै रोजी होणाऱ्या धरणे आंदोलनात शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या सर्व प्रांतीय पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, जिल्हा कार्यवाह व सदस्यांनी केले आहे.