आपला जिल्हाक्राईम
२४ पालकांवर गडचिरोली पोलिसांकडून गुन्हे दाखल
अल्पवयीन मुलांना दुचाकी देणे महागात पडले

गडचिरोली, प्रतिनिधी:
गडचिरोली शहरात अल्पवयीन मुलांकडून विनापरवाना दुचाकी चालवून वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी वाढत असताना, पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शहरातील २४ पालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, या कारवाईमुळे पालकांमध्ये पोलिसांच्या कठोर भूमिकेची धास्ती निर्माण झाली आहे. या पावलाचे सर्व स्तरातून कौतुकही होत आहे.
गेल्या काही काळात शहरातील अपघातांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी वाहतूक शिस्त कायम ठेवण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने, २९ जून २०२५ रोजी १४ पालकांवर व ३ जुलै २०२५ रोजी आणखी १० पालकांवर अशी एकूण २४ पालकांवर गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
शहरातील पाच विविध ठिकाणी राबवण्यात आलेल्या नाकाबंदी मोहिमेत वाहन तपासणी दरम्यान ही कारवाई पार पडली. तपासणीत अनेक अल्पवयीन मुले दुचाकी चालवतांना आढळली. या मुलांकडे कोणताही परवाना नसताना त्यांच्या पालकांनी त्यांना वाहन दिले असल्यामुळे, मोटार वाहन (सुधारणा) अधिनियम २०१९ कलम १९९(अ) नुसार गुन्हे दाखल करून वाहने जप्त करण्यात आली आहेत.
या कायद्यांतर्गत, अल्पवयीन व्यक्तीने वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित पालक किंवा वाहन मालकास तीन वर्षांपर्यंत कारावास किंवा रु.२५,००० पर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते. तसेच संबंधित अल्पवयीन मुलाविरुद्ध बाल न्याय अधिनियम २०१५ अंतर्गत बाल न्याय मंडळासमोर खटला चालविण्याची तरतूद आहे.
या मोहिमेबाबत बोलताना पोलीस अधीक्षक नीलोत्पल म्हणाले, “शहरातील अपघातांचे प्रमाण कमी करणे हा आमचा उद्देश असून, पालकांनीही जबाबदारीने वागून मुलांना वाहतूक नियमांची माहिती व शिस्त शिकवावी.” तसेच ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



