गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशनतर्फे मराठी पत्रकार दिन उत्साहात साजरा

गडचिरोली, दि. ६ जानेवारी :
मराठी पत्रकारितेचे जनक ‘दर्पणकार’ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त मराठी पत्रकार दिन गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशनच्या वतीने गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौक येथील शासकीय विश्रामगृहात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ पत्रकार जयंत निमगडे यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशनचे उदय धकाते होते. प्रमुख अतिथी म्हणून ‘आजतक’चे व्यंकटेश दुडमवार, अनिल बोदलकर उपस्थित होते. यावेळी संयोजक तिलोत्तमा समर हाजरा, प्रा. श्रीमंत सुरपाम, निलेश सातपुते, सुरज हजारे, कृष्णा वाघाडे, म्हशाखेत्री आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित पत्रकारांनी मराठी पत्रकारितेच्या जडणघडणीत आचार्य जांभेकर यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाचा गौरव केला. सत्य, निर्भीडता आणि समाजाभिमुखता ही पत्रकारितेची मूलभूत मूल्ये जपण्याचा संकल्प सर्वांनी व्यक्त केला.
कार्यक्रमादरम्यान गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशनच्या कार्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. संघटनेची एकजूट अधिक मजबूत करणे, पत्रकारांच्या हक्कांसाठी संघटितपणे लढा देणे व संघटना अधिक सक्षम करण्यावर विशेष भर देण्यात आला. संघटनेच्या बळकटीसाठी सर्व सदस्यांनी एकत्र येऊन सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला.
याप्रसंगी जिल्ह्यातील डिजिटल मीडियाचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन निलेश सातपुते यांनी तर आभार प्रदर्शन सूरज हजारे यांनी केले.


