गडचिरोली, प्रतिनिधी :-
मुधोली-जैरामपूर-गणपूर परिसरातील वरद फेरो अलॉय प्रा. लि. यांच्या लोह प्रक्रिया प्रकल्पासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पर्यावरणीय जनसुनावणीदरम्यान वाद निर्माण झाला. शेतकऱ्यांच्या वतीने सहभागी होण्यासाठी आलेल्या शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी गेटवरच रोखल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यामुळे संतप्त झालेल्या शेकाप नेते भाई रामदास जराते, माकप जिल्हा सचिव कॉ. अमोल मारकवार आणि भाकप जिल्हा सचिव कॉ. देवराव चवळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन केले. या प्रकाराचा त्यांनी तीव्र निषेध नोंदविला.
भाई रामदास जराते यांनी सांगितले की, प्रस्तावित प्रकल्पासाठी स्थानिक शेतकऱ्यांचा जमीन देण्यास तीव्र विरोध आहे. संबंधित जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण न करता पर्यावरणीय जनसुनावणी घेणे म्हणजे अनुसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर अन्याय करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, या निर्णयाविरोधात योग्य प्रशासकीय व कायदेशीर यंत्रणांकडे दाद मागण्यात येईल तसेच गरज भासल्यास व्यापक आंदोलन उभारण्याचा इशारा संबंधित नेत्यांनी दिला आहे.
Back to top button