मौजा चुरमुरा येथील विकास ताडपल्लीवार या तरुणाचा भीषण अपघात झाल्यानंतर उपचारासाठी मोठी परवड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अपघातात विकासचा डावा पाय पूर्णपणे तुटला असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
१६ फेब्रुवारी रोजी विकास आपल्या पत्नीला मजुरीच्या कामासाठी शेतात सोडून दुचाकीने गावाकडे परत येत असताना आरमोरीहून गडचिरोली कडे जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. कॉ. अमोल मारकवार यांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र येथे काही प्राथमिक उपचारानंतर शस्त्रक्रिया शक्य नसल्याचे सांगून त्याला चंद्रपूर येथे हलविण्याचा सल्ला देण्यात आला.
Oplus_131072
रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने कुटुंबीयांनी खाजगी वाहनाने त्याला चंद्रपूरला नेले. तेथेही शस्त्रक्रिया होऊ शकत नसल्याचे सांगून पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्याचा सल्ला देण्यात आला. आर्थिक अडचणी व रुग्णवाहिकेअभावी कुटुंबीयांना मोठा मानसिक व आर्थिक ताण सहन करावा लागला.
अखेर विकासला ब्रम्हपुरी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे दुर्गम भागातील आरोग्य सुविधांबाबत प्रश्न उपस्थित होत असून, स्थानिकांनी आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
दरम्यान, या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यात अशी परिस्थिती निर्माण होणे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते अमोल मारकवार यांनी व्यक्त केली आहे.